अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार व देशी दारू अड्यांवर LCB ची एकाच दिवशी मोठी कारवाई

क्राईम महाराष्ट्र

4 गुन्हे दाखल, 7 आरोपींवर कारवाई; 3 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त

नगर: अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ऑनलाईन बिंगो जुगार, अवैध गॅस रिफिलींग तसेच अवैध देशी व गावठी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून 7 आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यांमध्ये 3,32,240 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांनी विशेष तपास पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोउपनि अनंत सालगुडे यांच्यासह पोलीस अंमलदार अतुल लोटके, सुनील पवार, गणेश लबडे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, रोहित येमुल, उत्तरेश्वर मोराळे यांचे स्वतंत्र पथक तयार करून वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आले.

एकाच दिवशी तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे

दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो जुगार अड्ड्यावर,

तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गॅस रिफिलींग करणाऱ्यावर,

तर नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारू व गावठी हातभट्टी विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकले.

कारवाईचा सविस्तर तपशील

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत ऑनलाईन बिंगो जुगार चालविताना चार आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गु.र.नं. 52/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 2,63,300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी उमेश विठ्ठल राऊत (28), सोनू संदीप आजबे (19), विशाल बापु गोसावी (25), आकाश भास्कर गोसावी (27) हे सर्व अहिल्यानगर शहरातील रहिवासी आहेत.तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गॅस रिफिलींग करताना एक इसम आढळून आला. त्याच्याविरुद्ध गु.र.नं. 49/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125, 287, 288 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 44,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे नाव किरण बबन दंडवते (41, रा. सावेडी, अहिल्यानगर) असे आहे.

नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारू व गावठी हातभट्टी विक्री करणाऱ्यांविरोधात दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या.यामध्ये गु.र.नं. 54/2026 दारूबंदी कायदा कलम 65(ई) अन्वये विजय अशोक चव्हाण (38, रा. देवगड, ता. नेवासा) याच्यावर गुन्हा दाखल करून 11,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच गु.र.नं. 55/2026 दारूबंदी कायदा कलम 65(ई) अन्वये गणेश सोन्याबापु धेडगे (25, रा. देवगड, ता. नेवासा) याच्यावर कारवाई करत 1,400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस प्रशासनाचा इशारा

जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असून कायदा मोडणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.