शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील एका साध्या गॅरेज चालकापासून सुरु झालेली अंमली पदार्थांची चौकशी थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस दलातील हवालदारापर्यंत जाऊन पोहोचल्याने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत तब्बल १० किलो ७०७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह पाच आरोपींना अटक, तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त केले आहे.
नशामुक्त भारत मोहिमे अंतर्गत कारवाई…
भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंमली व तंबाखुजन्य पदार्थांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्याच आदेशांची अंमलबजावणी करत हि धडक कारवाई करण्यात आली.
गुप्त बातमी, अचूक छापा आणि मोठा साठा…
दि १७ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की,शिरुर येथील शादाब रियाज शेख (वय ४१) हा गॅरेज चालक हिरो होंडा पॅशन दुचाकीवरुन बाबुरावनगर परिसरात अंमली पदार्थ विक्रीस येणार आहे. पोलिसांनी दि १८ जानेवारी रोजी मध्यरात्री १२:१० वाजता छापा टाकत शादाब शेख याला रंगेहाथ पकडण्यात त्याच्याकडून १ किलो ५२ ग्रॅम मेफेड्रोन व दुचाकी जप्त करण्यात आली.या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकशीतून उघड झाली आंतरजिल्हा टोळी…
शादाब शेखच्या चौकशीतून पुढील आरोपी निष्पन्न झाले
ज्ञानदेव ऊर्फ माऊली शिंदे (वय ३७) कुरुंद, पारनेर
ऋषीकेश चित्तर (वय ३५) कुरुंद, पारनेर
महेश गायकवाड (वय २७) हिंगणी, श्रीगोंदा
या तिघांकडून तब्बल ९ किलो ६५५ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली.
पोलीस हवालदारच निघाला ‘ड्रग्स डिलर’
या अंमली पदार्थांचा मुख्य पुरवठादार म्हणून शामसुंदर विश्वनाथ गुजर (वय ३९)रा. नेप्ती, ता. नगर, जि. अहिल्यानगर पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर याचे नाव पुढे आले.धक्कादायक बाब म्हणजे, गुजर याने पोलीस दलाच्या मुद्देमाल कक्षातील एनडीपीएस गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थच बाहेर काढून विक्री केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजली आहे.या सर्व आरोपीना न्यायालयासमोर हजर केले असता मंगळवार दि २७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपासात आणखी मोठी नावे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, महादेव शेलार, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, शिक्रापूरचे पोलिस उपनिरीक्षक पंडीत मांजरे, शिरुरचे पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटींग, पोलीस मुख्यालयाचे पोलिस कॉन्स्टेबल पोपट गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीण, निलेश शिंदे, राहुल पवार, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, समाधान नाईकनवरे, भाउसाहेब पुंड, सचिन घाडगे, धिरज जाधव, अजित भुजबळ, आसिफ शेख, दिपक साबळे, अक्षय नवले, संदिप वारे, हनुमंत पासलकर, तुषार भोईटे, अमोल शेडगे, मंगेश भगत, गणेश धनवे, बाळासाहेब खडके, नितीन सुद्रीक, बाळू भवर, निरज पिसाळ, अंबादास थोरे, सचिन भोई, नितेश थोरात, विजय शिंदे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.