बिग बॉसच्या घरात जाणार का? ‘बिग बॉस मराठी संदर्भात अमृता खानविलकर हिचं स्पष्ट वक्तव्य

मनोरंजन

मुंबई: सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी च्या सहाव्या सिझनची जोरदार चर्चा रंगली आहे. पाचव्या आठवड्यापर्यंत स्पर्धकांनी घरात चांगलाच रंग भरला असून नुकतेच दोन स्पर्धक बाद झाल्याने खेळात अधिक चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांच्या संभाव्य एन्ट्रीबाबत चर्चा सुरू असताना अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)हिने बिग बॉसच्या घरात जाण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

एका मुलाखतीत बोलताना अमृताने सांगितले की, “मी माझ्या कारकिर्दीत अनेक शो केले आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र माझ्या कुटुंबाने मला फक्त बिग बॉसच्या घरात जाण्यास नकार दिला आहे. त्यांना वाटतं की, मी जर त्या घरात गेले तर कुणाला तरी मारेन किंवा मार खाऊन येईन. पण मी कुणाकडून मार खाऊन घेणार नाही, हे मात्र नक्की,” असे ती हसत म्हणाली.

तिने पुढे स्पष्ट केले की, “काही गोष्टी पडद्यामागेच चांगल्या वाटतात. त्या मला करायच्या नाहीत.” त्यामुळे आगामी काळात ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दिसणार का, याबाबत उत्सुकता कायम आहे.

दरम्यान, अमृता खानविलकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयासोबतच तिच्या नृत्यशैलीलाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. सध्या ती ‘तस्करी’ या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता इम्रान हाश्मी (Emran hashmi) प्रमुख भूमिकेत दिसत असून ही सिरीज Netflixवर प्रदर्शित झाली आहे. या सिरीजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.एकूणच, अमृताच्या या वक्तव्यामुळे बिग बॉसच्या घरात तिची एन्ट्री होणार की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.