‘जावे विनोदाच्या गावा’ रंगला, ‘लोकसेवेचा लोकजागर’ ग्रंथाचे प्रकाशन
मुंबई: कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन आज विधान भवनात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातील विनोदी साहित्याचे अभिवाचन, संवाद आणि सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली.याचवेळी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित ‘लोकसेवेचा लोकजागर’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
“मराठीला ज्ञानभाषा बनवू” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मराठी भाषा ही केवळ व्यवहाराची नव्हे, तर ज्ञानभाषा म्हणून पुढे यायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रमाण भाषेचे महत्त्व अधोरेखित केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात दर्जा देऊन मराठीला राजाश्रय दिला. भाषेचा गोडवा टिकवून तिचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.”
“माय मराठीचे वैभव वाढवूया” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मराठीला हजारो वर्षांची परंपरा आहे. आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे ही विनोदाची दोन शिखरे आहेत. खान्देशी, कोंकणी, अहिरणी या मराठीच्या समृद्ध बोली आहेत. अभिजात दर्जा टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.”
“मराठीच्या प्रचारासाठी शासन कटिबद्ध” – सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्य शासनाच्या मराठी भाषा संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि प्रशासन, शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात मराठीचा वापर वाढविण्यावर भर दिला.
अभिजात दर्जासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सातत्याने पाठपुरावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने हा दर्जा प्रदान केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तंत्रज्ञान युगातही मराठी शिक्षण आणि भाषेचे जतन करण्याची जबाबदारी अधोरेखित केली.
साहित्यिक मेजवानीने रंगली संध्याकाळ
कार्यक्रमाची सुरुवात ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीताने झाली. पु. ल. देशपांडे यांच्या ‘माझा शत्रूपक्ष’ या लेखाचे अभिवाचन ऋषिकेश जोशी यांनी केले, तर जयवंत दळवी यांच्या ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा’ या लेखाचे वाचन केदार शिंदे यांनी सादर केले. विंदा करंदीकर यांच्या निवडक कवितांचे वाचनही झाले.
“आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे : विनोदाची दोन शिखरे” या विषयावर मिलिंद जोशी यांनी संवाद साधला. लोकगीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.हा कार्यक्रम मराठी भाषेच्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा देणारा ठरला. उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून पुढे नेण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.