अजितदादांच्या दूरदृष्टीला समर्पित अर्थसंकल्प; विकसित महाराष्ट्राचा पाया; सुनिल तटकरे

महाराष्ट्र

मुंबई: यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करून विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा ठरल्याबद्दल महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अभिनंदन करत आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प मांडला आहे. त्याच धर्तीवर विकसित महाराष्ट्राचा वेध घेणारा आणि पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे तटकरे म्हणाले.

बळीराजासाठी कर्जमाफी, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, सामाजिक लाभाच्या विविध योजना, पायाभूत सुविधांचे महत्वाकांक्षी प्रकल्प, उद्योग-रोजगार वाढ आणि जागतिक शिक्षणाच्या संधी देणारा हा अर्थसंकल्प म्हणजे अजितदादांच्या महत्वाकांक्षी आणि दूरदृष्टीचा दृढ संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशात विविध क्षेत्रांत अव्वलस्थानी असलेल्या महाराष्ट्राला जागतिक स्पर्धेत आधुनिक व विकसित राज्य म्हणून ओळख देणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही तटकरे म्हणाले. २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचा निर्धार या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाला असून ही महाराष्ट्राची जमेची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वर्गीय अजित पवार यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांना हा अर्थसंकल्प सादर करावा लागला. मात्र अजितदादांच्या संकल्पना, आर्थिक शिस्त आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेध घेणाऱ्या त्यांच्या दृष्टीकोनाची छाप या अर्थसंकल्पात दिसून येत असल्याचे समाधान असल्याचे तटकरे यांनी सांगितले.या अर्थसंकल्पाचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी धन्यवाद दिले.