मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा दिवंगत नेते अजित पवार यांच्या विकासाच्या व्हिजनला समर्पित असून २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
मुंडे म्हणाले की, महाराष्ट्राला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प प्रगतिशील, शाश्वत, सुशासन आणि सर्वसमावेशक या चार स्तंभांवर आधारित असून राज्याच्या सर्वांगीण विकासाची चतुसूत्री यात मांडण्यात आली आहे.
२५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्याबद्दल मुंडे यांनी समाधान व्यक्त केले. हा निर्णय महायुती सरकारवर जनतेने टाकलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नार-पार प्रकल्पातून ५४ टीएमसी पाणी आणण्याचा निर्णय तसेच विदर्भ, खानदेश आणि कोकणातील नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता व निधी देण्यात आल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.
ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, महामार्ग, सागरी मार्ग, मेट्रोसारखे मोठे प्रकल्प मंजूर करण्यात आले असून एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला काँक्रिट रस्त्याने जोडण्याचा निर्णय आगामी काळात क्रांतिकारक ठरेल, असेही मुंडे यांनी म्हटले.
याशिवाय बीड जिल्ह्यातील वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जिल्ह्यातील रेल्वे मार्गासाठी राज्याचा हिस्सा, तसेच स्वामी रामानंद तिर्थ रूरल मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयाच्या विकासकामांसाठी निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य लोकसेवा आयोग व इतर शासकीय विभागांमध्ये ७५ हजार पदनिर्मिती, दीड लाख उद्योजक आणि ५० हजार स्टार्टअप्स तयार करण्याचे लक्ष्य रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याचा आणि त्यांच्या नावाने नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत मुंडे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.