दूषित पाण्यावर मुंबईकरांचा जीव धोक्यात; तात्काळ उपाय न केल्यास आंदोलन; ॲड. अमोल मातेले
मुंबई: मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना दूषित, दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रमुख अभियंता (जल विभाग) यांना ई-मेलद्वारे इशारा दिला आहे.
मुंबईसारख्या महानगरात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करणे ही महानगरपालिका प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळलेले, दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पाणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे मातेले यांनी पत्रात नमूद केले आहे. याशिवाय वारंवार होणारी पाणी कपात आणि जलवाहिन्यांमधील गळतीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
याउलट महानगरपालिका प्रशासन नागरिकांकडून पाणीपट्टी व जलदेयक वसुलीसाठी कठोर कारवाई करत असून थकबाकीदारांवर पाणी जोडणी तोडण्याचा इशारा दिला जात आहे. मात्र नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या जबाबदारीकडे जल विभागाकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
मातेले यांनी जल विभागाकडे खालील मागण्या केल्या आहेत :
दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असलेल्या भागांची तातडीने चौकशी करावी.
संबंधित जलवाहिन्यांची तांत्रिक तपासणी करून गळती किंवा सांडपाणी मिश्रण आढळल्यास त्वरित दुरुस्ती करावी.
नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात.
जल विभागाच्या निष्काळजीपणामुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेची नियमित तपासणी व प्रभावी नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करावी.
दरम्यान, मुंबईकरांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा देत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असेही ॲड. मातेले यांनी स्पष्ट केले.सदर पत्राची प्रत मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच सर्व विभागांच्या संबंधित सहाय्यक आयुक्तांना पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.