युद्धाचा परिणाम! गॅस सिलिंडर महाग; सरकारने बदलले एलपीजीचे ५ नियम

महाराष्ट्र

मुंबई: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभर दिसून येत असून त्याचा फटका भारतालाही बसू लागला आहे. देशात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी गॅस वितरणातही उशीर होत आहे. त्यामुळे गॅससाठी नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावा आणि काळाबाजार रोखला जावा यासाठी केंद्र सरकारने एलपीजी वितरणाच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारने एकूण पाच नियमांत बदल केले आहेत.

सरकारने ७ मार्चपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत सुमारे सात टक्के वाढ केली आहे. त्यामुळे १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता सुमारे ९६५ रुपयांवर पोहोचली आहे. तसेच गॅस बुकिंगच्या नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. एका सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर दुसरा सिलिंडर लगेच बुक करता येणार नाही. शहरांमध्ये दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान २५ दिवसांची तर ग्रामीण भागात ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

याशिवाय गॅस वितरणाबाबतही नवा नियम लागू करण्यात आला आहे. सिलिंडर बुक केल्यानंतर तो साधारण अडीच दिवसांत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एका ग्राहकाला वर्षभरात जास्तीत जास्त १५ सिलिंडर बुक करता येणार आहेत.

सरकारने पीएनजी (पाईप्ड नॅच्यूरल गॅस) वापरणाऱ्या घरांबाबतही नियम कडक केले आहेत. ज्या घरांमध्ये पीएनजीची सुविधा उपलब्ध आहे, त्या घरांना एलपीजी गॅस सिलिंडर देण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारकडून कठोर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नव्या नियमांचा विचार करून गॅस वापराचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.