भाजपा-शिवसेना पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; टिळक भवनात शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे विविध पक्ष व संघटनांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी तसेच संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा यात समावेश होता.

प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास वाढत असल्याचे सांगत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिन सावंत, अनंत गाडगीळ, सिद्धार्थ हत्तिअंबिरे, धनंजय शिंदे, प्रा. प्रकाश सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व यावर लोकांचा विश्वास वाढत आहे. देशातील धर्मांध शक्तींना तोंड देण्यासाठी काँग्रेसच सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर टीका करत सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याचा आरोप केला. आर्थिक विषमता वाढत असून शेतकरी, शेतमजूर आणि वंचित घटकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्ष जनतेच्या भावनांशी एकरूप असून पुढील पिढीसाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.