सेक्स रॅकेट प्रकरणाने महाराष्ट्र हादरला; अशोक खरात अटकेत, SIT मार्फत सखोल चौकशी सुरू

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर: राज्यात खळबळ उडवणाऱ्या कथित सेक्स रॅकेट आणि लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला २४ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपीवर बलात्कार, फसवणूक, धमकी यांसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसारही कारवाई करण्यात आली आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या घरातून सुमारे ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून, महिलांना अमली पदार्थ देऊन त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्याद्वारे ब्लॅकमेल केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय विवाहित महिलांना उद्योगपतींशी जोडून त्यातून लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचा नवा प्रकारही समोर आला आहे.या प्रकरणात आरोपीचे अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या संघटित रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.पोलिसांकडून या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध सुरू असून, संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.