फुले द्विशताब्दी वर्षासाठी राज्यभर वर्षभर उपक्रम; शालेय शिक्षण विभागाचा व्यापक आराखडा जाहीर

महाराष्ट्र

मुंबई: महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त सन 2027 हे द्विशताब्दी वर्ष राज्यभर विविध उपक्रमांनी साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत सर्व शाळांमध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी व्यापक कृती आराखडा जाहीर केला आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली असून, त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करत विद्यार्थ्यांमध्ये समता, सामाजिक न्याय, स्त्री शिक्षण आणि मानवतेच्या मूल्यांची जाणीव निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी शाळांमध्ये व्याख्याने, वेबिनार, परिसंवाद, वाचन उपक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच पथनाट्य, एकपात्री नाटके, समता दौड, ग्रामभेट, पोस्टर व निबंध स्पर्धा, विज्ञान आणि आयसीटी आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत. ‘महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह’ साजरा करण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर असेल.फुले 200 या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी उपक्रमांचे फोटो व व्हिडिओ ऑनलाइन शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत हे उपक्रम शाळांमध्ये राबविणे बंधनकारक राहणार आहे.

महिनानिहाय नियोजनानुसार जनजागृती, पर्यावरण, सामाजिक समता, स्त्री सक्षमीकरण, नेतृत्व, सांस्कृतिक विकास, संशोधन व विविध स्पर्धा अशा विषयांवर वर्षभर उपक्रम होणार आहेत. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दरमहा आढावा घेतला जाणार आहे.महात्मा फुले यांची 200 वी जयंती ही केवळ उत्सव नसून सामाजिक परिवर्तनाची संधी असल्याचे प्रतिपादन मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.