मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा ‘AI म्हणजे आई-माय’ हा विचारप्रधान लेख सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence पेक्षा ‘AI’चा अर्थ ‘आई’ आणि ‘माय’ असा मांडत लेखकाने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर परखड भाष्य केले आहे.
लेखात लोकप्रतिनिधींनी केवळ अनुदान, पॅकेज आणि आश्वासनांच्या ‘झोळ्या’ वाटण्यापेक्षा जनतेला स्वाभिमानाने उभे राहण्यासाठी रोजगार, हमीभाव, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.शेतकरी आत्महत्या, महिलांची असुरक्षितता, बेरोजगारी, ग्रामीण भागातील रस्ते आणि पाणीटंचाई यांसारख्या प्रश्नांकडे लक्ष वेधत “मज नकोत अश्रू, घाम हवा” हा संदेश अधोरेखित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देत “रयतेचे मायबाप” असलेले नेतृत्व आजच्या काळात आवश्यक असल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे. तसेच ट्रोल संस्कृती, पक्षपाती इन्फ्लुएंसर्स आणि सत्तेभोवती निर्माण झालेल्या ‘बुभुक्षितांच्या थव्या’वरही टीका करण्यात आली आहे.“लोकप्रतिनिधी पालक हवेत, झोळीचे चालक नकोत,” असा स्पष्ट संदेश देत लेखाचा समारोप करण्यात आला आहे.