इराण-अमेरिका संघर्षाचा फटका; पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग

महाराष्ट्र

दहा दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

नवी दिल्ली: देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. अवघ्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली असून, शनिवारी पेट्रोलच्या दरात ८७ पैशांनी तर डिझेलच्या दरात ९१ पैशांनी वाढ करण्यात आली.

यापूर्वीही केंद्र सरकारने इंधन दरात प्रतिलिटर सुमारे ३ रुपयांची वाढ केली होती. सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वाहतूकदार आणि उद्योग क्षेत्रावर आर्थिक ताण वाढत आहे.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचे पडसाद भारतातही उमटत आहेत. तेल कंपन्यांवरील दबाव वाढल्याने इंधन दरवाढ अपरिहार्य असल्याचे सांगितले जात आहे.

इंधन महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, बांधकाम साहित्य आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होणार आहे. विशेषतः शेती आणि उद्योग क्षेत्रासाठी ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत इराण-अमेरिका संघर्ष निवळत नाही तोपर्यंत जागतिक तेल बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते. त्यामुळे आगामी काळातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत