ट्रेलरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू…

क्राईम महाराष्ट्र

चाकण: चाकण तळेगाव मार्गावर खालुंब्रे, ता. खेड गावच्या हद्दीत आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कंपनीत कामासाठी निघालेल्या दुचाकीवरील कामगाराचा ट्रेलरच्या धडकेत चाकाखाली गेल्याने जागीच मृत्यू झाला. गजानन बाबुराव बोलकेकर (वय- २७), रा. येलवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याच्या शरीराचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला होता. दुचाकी चालक जखमी असून त्याच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली. चाकण औद्योगिक वसाहतीतील ऑटोकॉम कार्पोरेशन पानसे प्रा. लिमिटेड या कंपनीत बोलकेकर कामास होता. तळेगाव बाजूकडून तो चाकण बाजूकडे येत होता. दुचाकीच्या पाठीमागे तो बसलेला होता.

ट्रेलर तळेगाव बाजूकडून चाकण बाजूकडे चालला होता. बोलकेकर हे एचआर एक्झिक्युटिव्ह म्हणून कंपनीत काम करत होते. ते सध्या येलवाडी, ता. खेड येथे राहत होते. १८ एप्रिल ला त्यांचा विवाह झाला होता. ते मुळचे बोळका, जि. नांदेड येथील आहे. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. कंपनीचे व्यवस्थापक सुरेश नायर व इतर कामगारांनी या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.

याबाबत कंपनीचे व्यवस्थापक सुरेश नायर यांनी सांगितले की, ‘चाकण- तळेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. अनेक कामगारांचे जीव जात आहेत, पण याकडे शासन कोणीच लक्ष देत नाही. एक कामगार गेल्याने त्याचे सगळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे याकडे शासनाने आता तरी डोळे उघडून पाहावे.