राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना नव्या जोमाने आणि आत्मविश्वासाने कामाला लागण्याचे आवाहन केले. “वादळांना घाबरून आम्ही आमची गलबते कधी वळवली नाहीत. संघर्षाच्या या रणांगणात राष्ट्रवादी काँग्रेस कधीही मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांनुसार विकसित महाराष्ट्र उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर पक्षाची वाटचाल सुरू असून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणे हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुथस्तरावर संघटना मजबूत करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. “माझा बुथ, माझा गाव” ही संकल्पना प्रभावीपणे राबवून मतदार यादीतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पक्षातील ज्येष्ठांचा अनुभव आणि युवकांची ऊर्जा यांचा समन्वय साधून पक्षाची भविष्यातील वाटचाल होईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी पक्षाला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अजितदादा पवार यांच्या योगदानाची आठवण करून देत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षातील एकजूट आणि संघटन बळकट करण्यावर भर दिला, तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाला पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि देशभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. षण्मुखानंद सभागृह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुडुंब भरून गेले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत