पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

महाराष्ट्र

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपासाला वेग दिला आहे. डॉ. गोऱ्हे यांनी नुकतीच सीआयडी पुणे कार्यालयाला भेट देऊन तपासाचा सविस्तर आढावा घेतला होता. त्यांच्या सूचनांनुसार तपास अधिक व्यापक आणि सर्वंकष करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, दापोडी आणि हडपसर येथील विषारी हातभट्टी दारू प्रकरणातील गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून यासाठी १० विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दापोडी प्रकरणातील सहाही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी आणि आर्यन संजय धोत्रे यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनाही सीआयडीच्या तपासात समाविष्ट करून चौकशी केली जात आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाने ठाणे येथे दाखल केलेल्या संबंधित गुन्ह्यातील आरोपींना तपासात सहभागी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तपासादरम्यान विविध घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज, दारूचे नमुने आणि अन्य पुरावे जप्त करून न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून मेथेनॉल पुरवठा साखळीतील दोन महत्त्वाचे संशयित निष्पन्न झाल्याची माहिती सीआयडीने दिली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक शामराव काळे आणि सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून नागरिकांनी या गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती असल्यास तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“पुणे विषारी दारू प्रकरणात सीआयडी अधिकाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करून माझ्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि सर्वंकष पद्धतीने होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल, असा मला विश्वास आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत