राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होत आहेत. कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात अशा पदार्थांच्या विक्रीस बंदी असतानाही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची बाब समोर आली आहे.
शाळांमध्ये ‘तंबाखूमुक्त’ फलक लावून जनजागृती केली जात असताना, अनेक महाविद्यालयांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून केवळ अधूनमधून कारवाईचा दिखावा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, काही पानपट्ट्यांमधून नशेचे पानविडे विकले जात असल्याचाही आरोप असून, या अवैध व्यवसायामागील साखळीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी केवळ फलक नव्हे तर प्रभावी अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.