वाघोली ते शिरुर शहर बस सेवा सुरु करण्याची मागणी; राहुल पाचर्णे

महाराष्ट्र

वाघोली: PMPML चा वाघोली बसडेपो पूर्ण क्षमतेने चालू झाल्याने वाघोली डेपो अंतर्गत वाघोली ते शिरूर शहर बससेवा सुरु करण्याची मागणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे पुणे जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे यांनी केली आहे.

जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाघोली PMPMLचा बसडेपो पूर्ण क्षमतेने गेल्या महिन्यात चालू झाला आहे.

सध्या वाघोली ते रांजणगाव MIDC मार्गे कारेगाव अशी PMPML ची बससेवा सुरु आहे. पूर्वी सदर मार्गावर पुणे स्टेशन ते कारेगाव अशी बससेवा सुरु होती. सदर मार्गावर मोठ्याप्रमाणावर कामगार, विद्यार्थी, नागरिक पुणे, वाघोली, रांजणगाव MIDC, शिक्रापूर, कोरेगाव, पुणे या ठिकाणी येतात असल्याने सदर बस सेवेला चांगला प्रतिसाद आहे.

शिरुर शहर तसेच रामलिंग रोड व बाबुरावनगर परिसरात नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. शिरूर शहर हे तीन तालुक्याची बाजारपेठ आहे. रामलिंग रोड व बाबुरावनगर परिसर PMRDA च्या हद्दीत येत असून या परिसरातून रांजणगाव MIDC, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वाघोली, पुणे येथे जाणाऱ्या नागरिक, विद्यार्थी, कामगार वर्ग यांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे. PMPML चा वाघोली डेपो पूर्ण क्षमतेने चालू झाल्याने पीएमपीएमएलची सेवा वाघोली कारेगाव न ठेवता ती पुढे वाघोली ते शिरुर असे केल्यास सदर बस सेवेला निश्चितच नागरिक, विद्यार्थी व कामगार वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळेल.

शिरुर शहर व रामलिंग रोड बाबुराव नगर परिसरातील नागरिक, विद्यार्थी कामगार वर्ग यांच्या सोयीच्या दृष्टीने वाघोली ते शिरूर शहर अशी वाघोली डेपो अंतर्गत पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्याची मागणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्यासह पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.