सारथीच्या योजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

महाराष्ट्र

पुणे: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा उत्सव असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक, शिक्षक आणि सारथी संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद केले.

सारथीने शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून आजपर्यंत युपीएससीमध्ये १४० तर एमपीएससीमध्ये १,२४५ अधिकारी घडविल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच विविध शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास योजनांमुळे हजारो युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

सारथीच्या प्रशासकीय मुख्यालयासह आठ विभागीय कार्यालये आणि प्रत्येकी ५०० विद्यार्थी व ५०० विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृह उभारणीसाठी १,३६० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासन युवकांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या प्रत्येक उपक्रमाच्या पाठीशी ठामपणे उभे असून सारथीच्या सर्व योजनांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दिली. तसेच प्रशासनात काम करताना सामान्य नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून सेवा करण्याचे आणि भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहनही त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत