मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपाने आणि निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ज्या नोटीसच्या आधारे नटराजन यांचा अर्ज बाद करण्यात आला होता, ती नोटीसच तेलंगणातील न्यायालयाने रद्द केल्याने आता राज्यसभा निवडणूक रद्द करून नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने ‘व्होटचोरी’नंतर आता ‘सीटचोरी’ करण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला. मिनाक्षी नटराजन यांनी माहिती लपवल्याचा आरोप करून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. मात्र, ज्या फॉर्म २६ मध्ये माहिती न दिल्याचा आक्षेप घेण्यात आला, त्या फॉर्ममध्ये संबंधित माहिती भरण्यासाठी कोणताही कॉलम नसल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. दरम्यान, नटराजन यांच्याशी संबंधित नसल्याचे स्पष्ट करत तेलंगणातील न्यायालयाने संबंधित नोटीसच रद्द केली आहे. त्यामुळे अर्ज रद्द करण्याचा आधारच संपुष्टात आला असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार, असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला.भाजपामध्ये नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्यावी, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरही सरकारवर टीका केली. महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून जाचक अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप त्यांनी केला. संपूर्ण कर्जमाफी आणि सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.रोहित पवार यांनी केलेल्या मागण्या रास्त असून सरकारने त्या तातडीने मान्य कराव्यात. त्यांच्या उपोषणस्थळी जाऊन आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते तथा माजी आमदार अनंत गाडगीळ उपस्थित होते.