हत्ती–मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना करा; विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

महाराष्ट्र

मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या हत्ती–मानव संघर्षाचा गंभीर प्रश्न काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत उपस्थित करत सरकारने तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात व्याहाड–सोनापूर मार्गावर २ जुलै रोजी रानटी हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहने (वय ३०) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र हत्तीने पाठलाग करून त्यांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक घटना असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, ही घटना त्यांच्या मतदारसंघात घडली असून आतापर्यंत रानटी हत्तींच्या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३० ते ३२ हत्तींचा कळप चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालत असून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेकडो झोपड्या आणि घरांचेही नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन विभागाकडून केवळ हत्ती हाकलण्याचे प्रयत्न केले जात असून, हत्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याने समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हत्ती–मानव संघर्ष हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण द्यावे, हत्तींच्या हालचालींवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सातत्याने लक्ष ठेवावे, नागरिकांना वेळेवर इशारे देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी आणि या प्रश्नासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच खाणकाम आणि जंगलातील अधिवासावर झालेल्या परिणामांमुळे हत्तींचे पारंपरिक मार्ग बाधित झाल्याने हा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी विधानसभा अध्यक्षांनीही हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवी जीव जात असतील तर शासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही हत्तींच्या हालचालींवर प्रभावीपणे लक्ष ठेवता येत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करत, शासनाने या प्रकरणी कोणत्या उपाययोजना करणार आहे याबाबत सभागृहात निवेदन सादर करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत