अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले. या घटनेत जाहीद हुसेन रिफाकत हुसेन (वय २८) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी शेख इम्रान ऊर्फ गोलू (वय २८), शेख अमीन (वय ३४) आणि शेख समीर (वय २७) या तिघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाहीद आणि त्याचे मित्र कॅम्प परिसरातील एका कॉम्प्लेक्समध्ये लुडो खेळत होते. खेळ जिंकल्यानंतर त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी जवळच मद्यपान करत असलेल्या आरोपींनी आरडाओरड करण्यावरून वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मुख्य आरोपी गोलूने चाकू काढून जाहीद आणि त्याच्या मित्रांना धमकावले.
जीव वाचवण्यासाठी जाहीद पळत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर चाकूने चार गंभीर वार केले. गंभीर जखमी झालेल्या जाहीदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिसांनी दोन आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. मात्र, मुख्य आरोपी गोलू इनोव्हा कारमधून फरार झाला. पोलिसांनी सुमारे एक तासाच्या थरारक पाठलागानंतर बडनेरा हायवेवरील कोंडेश्वर पॉईंटजवळ त्याला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी शेख इम्रान ऊर्फ गोलू हा सराईत गुन्हेगार असून, २०१८ मधील खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला होता. सुटका झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्याने पुन्हा खुनाचा गंभीर गुन्हा केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.