अमित शहांनी प्रवेशासाठी बोलावल्याचा दावा; राज्य भाजप नेतृत्वाने विरोध केल्याचा गौप्यस्फोट, गिरीश महाजनांवरही घणाघात
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप घरवापसीच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “मला वैयक्तिकरित्या भाजपमध्ये परत जाण्यात कोणताही रस नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि पुढेही त्यांच्यासोबतच राहणार,” असे खडसे यांनी ठामपणे सांगितले.
मात्र, आपल्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
यावेळी खडसे यांनी मोठा दावा करत लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बोलावून भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते, मात्र राज्यातील भाजप नेतृत्वाच्या विरोधामुळे तो विषय पुढे गेला नसल्याचे सांगितले.
खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही जोरदार टीका केली. “महाजनांना भाजपचे तिकीट मिळावे म्हणून मी स्वतः प्रयत्न केले होते. मंत्री होईपर्यंत त्यांना सर्व प्रकारची मदत केली. आज तेच सर्व विसरले आहेत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे तोपर्यंतच गिरीश महाजन यांचे राजकारण टिकेल,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे पुन्हा स्पष्ट करत, आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसासाठी शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांतील नेत्यांना निमंत्रण दिल्याची माहितीही खडसे यांनी दिली.