मराठवाडा आढावा बैठकीत सरकारवरही जोरदार टीका; “दुबार पेरणी, दुष्काळ आणि बोगस बियाण्यांप्रमाणे बोगस सरकार” असा हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अयोध्या राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला. राम मंदिरावरील देणगीप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करत त्यांना संघातून निष्कासित करण्याची हिंमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मराठवाडा विभागाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, राम मंदिराचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्यात आला असून आता मंदिरातील आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात विश्वस्त मंडळाने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली. राज्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस नियोजन नसल्याचा आरोप त्यांनी केला. “बोगस बियाण्यांप्रमाणेच हे सरकारही बोगस असून त्यांचा कारभारही बोगस आहे,” अशी टीका त्यांनी केली.
शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा आरोप करत त्यांनी आयकर विभागाकडून यादी मागवण्याच्या प्रक्रियेचाही उल्लेख केला. तसेच नीट, टीईटी आणि एमपीएससीसारख्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणांवर काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी या चर्चांचे खंडन केले असून त्यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवला पाहिजे. तसेच महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत नसून सत्तेचा समतोल बिघडल्याचेही त्यांनी म्हटले.