मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार, कायद्यानुसार आणि नियमानुसारच झाल्याचा ठाम दावा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी केला आहे. सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसवजा पत्रात कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तटकरे म्हणाले की, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नियमानुसार बोलावण्यात आली होती. बैठकीतील सर्व कामकाज आणि अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमांचे पालन करूनच पार पडली असून ती पूर्णपणे वैध आहे.
या प्रकरणावर लवकरच पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात येणार असून, कायदेतज्ज्ञ आणि वकिलांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. आवश्यक वाटल्यास संबंधितांवर पक्षशिस्तभंगाची किंवा अन्य कारवाईचाही विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दिल्ली पातळीवर यासंदर्भात काही घडले असल्याची माहिती नसल्याचे सांगताना तटकरे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने पत्र लिहिल्याने पक्षात असंतोष आहे, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. एका व्यक्तीचे मत म्हणजे संपूर्ण पक्षाची भूमिका नसते.पक्ष सध्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे आणि लोकशाही पद्धतीने कार्यरत असल्याचा पुनरुच्चारही सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.