ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर चक जंगलालगत रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या बल्लारपूर येथील आनंद दिवटे या तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी मृतकाच्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या पाठीशी कायम उभे राहण्याची ग्वाही दिली.
वन विभागाच्या वतीने मृतकाच्या वारसांना देण्यात आलेल्या १० लाख रुपयांच्या सानुग्रह मदतीचा धनादेश आमदार वडेट्टीवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तसेच शासनाकडून मिळणारी उर्वरित आर्थिक मदत आणि इतर सर्व लाभ तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
परिसरात वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी वन विभागाला तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. हल्लेखोर वाघाला तातडीने जेरबंद करणे, स्थानिक तरुणांची रोजंदारीवर नियुक्ती करून गस्त वाढविणे तसेच गाव आणि जंगलालगतच्या शेतांभोवती संरक्षक कुंपण उभारणे यासारख्या उपाययोजना त्वरित राबविण्याची मागणी त्यांनी केली.
वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांच्या जीविताचे संरक्षण ही वन विभागाची सर्वोच्च जबाबदारी असून, सुरक्षेबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक अरविंद जे., वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नरड, वनपाल लोणारे, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, गुरुदेव वाघरे, रुपेश बानबले, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.