‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची घोषणा

मुंबई: महाराष्ट्र सदनात आयोजित ‘ईशान सेतू – सांस्कृतिक एकात्मता व राष्ट्रनिर्माण’ सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईशान्य भारताशी सांस्कृतिक आणि भावनिक नाते अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी त्यांनी मणिपूरमध्ये मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्याची घोषणा केली. तसेच ईशान्य भारतात रामायण, श्रीमद्भगवद्गीता आणि हनुमान चालीसा यांसारख्या पवित्र ग्रंथांचे मोफत वितरण करण्याचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही स्वीकारली.

परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विविध राज्यांतील लोकप्रतिनिधी, सामाजिक-सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात ईशान्य भारतातील स्थानिक भाषांमध्ये रामायण, भगवद्गीता आणि हनुमान चालीसाचे अनुवाद प्रकाशित करण्यात आले.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, भारताची खरी ताकद ही त्याच्या सांस्कृतिक एकात्मतेत आहे. भाषा, वेशभूषा आणि परंपरा वेगळ्या असल्या तरी देशाचा आत्मा एकच आहे. ‘ईशान सेतू’ उपक्रम हा केवळ ग्रंथप्रकाशन नसून भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा महत्त्वाचा टप्पा आहे.

ईशान्य भारतातील स्थानिक भाषांमध्ये धार्मिक ग्रंथ उपलब्ध झाल्यास सांस्कृतिक आत्मविश्वास वाढेल आणि राष्ट्रीय एकात्मतेलाही नवे बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले. ईशान्य भारतातील समृद्ध साहित्याचे मराठी, हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्येही भाषांतर व्हावे, यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारतात शांतता आणि विकासाला चालना मिळाल्याचे नमूद करत शिंदे यांनी अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

भाषणाच्या शेवटी त्यांनी “काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते कामाख्या आणि मुंबई ते मणिपूर” असा सांस्कृतिक ऐक्याचा संदेश देत देशातील प्रत्येक नागरिकाने स्वतःला एका विराट भारतीय कुटुंबाचा सदस्य समजावे, असे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत