मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

महाराष्ट्र

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत, “राहुल गांधी यांनी वांगचुकांची भेट का घेतली नाही, यापेक्षा नरेंद्र मोदींनी अद्याप त्यांची भेट का घेतली नाही?” असा सवाल उपस्थित केला.

सपकाळ म्हणाले की, काँग्रेसने नीट पेपरफुटीचा मुद्दा आधीपासूनच लावून धरला असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मागील २० दिवसांपासून सोनम वांगचुक उपोषण करत असतानाही केंद्र सरकारने त्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. २४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळत असल्याचेही ते म्हणाले.

रामरक्षा कार्यक्रमाच्या निमंत्रणावरूनही सपकाळ यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीप्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी या प्रकरणासाठी भाजप-आरएसएसला जबाबदार धरले. तसेच, “मुख्यमंत्री आणि मोहन भागवत यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा कार्यक्रमाला उपस्थित राहावे,” असे आव्हान त्यांनी दिले.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संदर्भातील चर्चांवर बोलताना सपकाळ म्हणाले की, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून त्यावरच विश्वास ठेवावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत