आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार
शिरूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील आंबळे परिसरात चासकमान पाटबंधारे विभागाकडून कालव्याच्या पाटाचे सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम कालव्याच्या हेडऐवजी टेलपासून सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या मते, कालव्याच्या हेड भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असताना ती रोखण्याऐवजी टेलपासून अस्तरीकरण सुरू करण्यामागील कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. धरणातून सुमारे ६०० क्युसेस पाणी सोडले जात असले तरी शिरूर तालुक्यात पोहोचेपर्यंत ४०० ते ४२० क्युसेस पाण्याची गळती होत असून शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना केवळ १८० ते २०० क्युसेस पाणी मिळत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हेड भागातील गळती तातडीने थांबवली नाही तर शेतीसाठी आवश्यक पाणी मिळणार नाही. तसेच भूजल पातळी खालावून विहिरी, बोअरवेल आणि पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी आंबळे व परिसरातील ग्रामस्थांनी चासकमान पाटबंधारे विभागाला स्पष्ट इशारा दिला आहे. हेडपासून अस्तरीकरणाचे काम सुरू करण्याचा निर्णय तातडीने घेऊन सध्या सुरू असलेले टेलवरील काम थांबवावे, अन्यथा विभागाविरोधात तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
दरम्यान, या प्रकरणावर चासकमान पाटबंधारे विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.यावेळी युवा नेते मयुरदादा बेंद्रे, पंचायत समिती सदस्य दीपक शेठ कोकडे, तसेच विकास जाधव, पवन बेंद्रे, सुजित बेंद्रे, अभिजीत बेंद्रे, लोकेश बेंद्रे, आशुतोष बेंद्रे, तपन बेंद्रे, किरण बेंद्रे, केतन बेंद्रे आणि वायरमन प्रवीण पुंडे उपस्थित होते.