एकनाथ शिंदेंची बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत उद्धव-राज-राहुल गांधींवर टीका

महाराष्ट्र

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे “बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना” असल्याची टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करून देशात आणि महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव जनतेने हाणून पाडल्याचा दावा त्यांनी केला.

मुंबईतील नेस्को सेंटर येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, नीट पेपर लीक प्रकरण गंभीर असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कठोर कायदा आणण्याचा निर्णय घेतला. दोषींना दहा वर्षांपर्यंतची सक्त शिक्षा, दहा कोटी रुपयांपर्यंत दंड आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालवण्याची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एनटीएतील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून आरोपींना अटक झाली आहे. सीबीआय चौकशी सुरू असून दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पंतप्रधानांनी दिल्याचे शिंदे म्हणाले. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, ही लोकशाहीतील जबाबदार भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राहुल गांधींवर टीका करताना शिंदे म्हणाले की, जंतर-मंतरवरील आंदोलन सुरू असताना पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न हा आंदोलनाचा भाग नसून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होता. एसपीजी कायद्यानुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानाभोवती आंदोलनास बंदी असतानाही जाणीवपूर्वक गर्दी जमवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले की, काही नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन भडकाऊ भाषा वापरत आंदोलनात राजकारण मिसळण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्रातील जनतेने आणि विद्यार्थ्यांनी हा प्रयत्न फेटाळून लावल्याचा दावा त्यांनी केला.

“विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन संपले, मात्र त्यावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचा हिरमोड झाला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या व्यासपीठाचा वापर करू देऊ नये,” असे आवाहन करत शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून देश घडवण्याचे आवाहन केले.