उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त
ठाणे: राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ठाण्यात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, अकोले, शिर्डी-राहाता आणि कोपरगाव येथील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यामध्ये सचिन बडदे, हरिराम शेळके, डॉ. अजय म्हसे, महेंद्र धुमाळ, अनिल बांगरे, मुकूंद सिनकर यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील उबाठा गटाचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्यासह भीमराव भोसले, सुधीर पाटील, महादेव सोमवंशी, प्रवीण देवकर तसेच जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दौंड विधानसभा मतदारसंघातील दत्तात्रय शितोळे, ॲड. राजेंद्र काळे, विश्वास मांढरे, निलेश मदने, शहाजी दळवी आणि परेश भापकर यांनीही समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.
नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, विजयकुमार पाटील सुगावकर, संजय रावणगावकर, गणपत पाटील मंडलापूरकर, किरण पाटील धामणगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवागतांचे स्वागत करत, “शिवसेना ही सर्वसामान्यांची आणि विकासाला प्राधान्य देणारी संघटना आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वेच्छेने शिवसेनेत येत आहेत. जनतेचा विश्वास आणि विकासाची भूमिका हीच आमची खरी ताकद आहे,” असे सांगितले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला खासदार भाऊसाहेब वाघचौरे, आमदार विजयबापू शिवतारे, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार रवींद्र फाटक, बालाजी पाटील खतगावकर तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.