‘राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे’; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सचिन अहिर यांचा संदेश

महाराष्ट्र

वरळीत ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’चे उद्घाटन; ३९ विभागांच्या सहभागातून शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

मुंबई: “रयतेचा राजा सिंहासनावर बसून चालणार नाही, तर राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे, हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच विचारातून राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे,” असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.

वरळी विधानसभा मतदारसंघात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, महेश हरीचंद्रे, शिवसेना विभागप्रमुख दत्ता नरवणकर, भाजपचे किरण शेलार, माजी नगरसेविका रत्ना माळी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सचिन अहिर यांनी प्रशासनाने केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजांनुसार अशा शिबिरांचे आयोजन करावे, जेणेकरून शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, असे आवाहन केले.या अभियानात प्रशासनातील ३९ विभागांनी सहभाग घेतला. शेकडो लाभार्थींना विविध शासकीय योजनांची प्रमाणपत्रे, दाखले आणि अन्य सेवा यावेळी उपलब्ध करून देण्यात आल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवले जात असतील आणि त्यातून शेवटच्या घटकाची सेवा होत असेल, तर अशा उपक्रमांना माझा नेहमीच पाठिंबा असेल,” असा संदेश दिला.वरळीतील या शिबिरातून एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देत शासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा सकारात्मक संदेश देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत