दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

मुख्य बातम्या शिरूर तालुका

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई येथील युवा उद्योजक व समाजसेवक अमोल रामदास पुंडे यांनी विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप केले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास सुलभ होणार असून परिसरात त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बापूसाहेब ननवरे होते. यावेळी माजी सरपंच शिवराम पुंडे, माजी चेअरमन भाऊसाहेब तळोले, सरपंच कोंडीभाऊ पुंडे, बंडू पुंडे, मोहन पुंडे, दीपक तळोले, पोलीस अधिकारी विठ्ठलराव खर्डे, समाजसेवक शहाजी दळवी, लहू तळोले, रमेश खर्डे, पोपटराव तळोले, आबा शिंदे, निखिल पुंडे, अजित पुंडे, संग्राम ननवरे, राजेंद्र गावडे, अतुल गावडे, प्रतीक दाते, ओम आदक, निलेश ननवरे, अक्षय ननवरे, विद्यालयाचे पर्यवेक्षक मनोज धुमाळ, रामदास कुलट, संतोष पुंडे, आकाश भोकनळ, अविनाश भोकनळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली. गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

सायकल प्राप्त झालेल्या विद्यार्थिनी साईशा गायकवाड हिने, “ही सायकल माझ्या शिक्षणाच्या वाटचालीला नवे बळ देणारी ठरेल,” अशी भावना व्यक्त करत अमोल पुंडे यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने अमोल रामदास पुंडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य विनोद शिंदे यांनी आभार मानले, तर प्रकाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत