युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे; सुनेत्रा पवार यांचा संघटनबांधणीला वेग
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रूपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर हे पद मार्चपासून रिक्त होते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नागवडे यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान केले.
महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक असतानाही सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याला प्राधान्य देत दौंड तालुक्यातील वैशाली नागवडे यांच्यावर विश्वास दाखवला. पुणे जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
वैशाली नागवडे या सध्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या असून, यापूर्वी त्यांनी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर उघडपणे टीका केली होती. त्यांनी २०१७ आणि २०२० मध्ये राहू-खामगाव गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, पक्षाने युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांचीही नियुक्ती केली आहे. महिला आणि युवक संघटनांमध्ये नव्या नेतृत्वाला संधी देत पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनबांधणीला गती दिल्याचे मानले जात आहे.
रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद अद्याप रिक्त असून, त्या पदावर सुनेत्रा पवार कोणाची नियुक्ती करणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.