नियमांनुसार काम करायचे नसेल तर राजीनामा द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा

महाराष्ट्र

प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मुंढे यांची भूमिका; “एफडीएची लॅब ही २४ तास कार्यरत आणीबाणीची सेवा”

मुंबई : राज्यभरात अन्नभेसळ आणि नियमबाह्य कारभाराविरोधात धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागातील कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “शासनाच्या नियमानुसार काम करायचे नसेल, तर राजीनामा देऊन निघून जावे,” असे ठाम विधान त्यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळेतील २९ कर्मचाऱ्यांनी मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली होती. प्रयोगशाळेत दोन शिफ्टमध्ये काम सुरू केल्याने सकाळपासून रात्रीपर्यंत काम करावे लागत असल्याचा, तसेच शनिवार-रविवार आणि शासकीय सुट्ट्यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश दिले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण वाढल्याचीही तक्रार करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना तुकाराम मुंढे म्हणाले की, अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळा ही साधी सरकारी कचेरी नसून जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित २४ तास कार्यरत राहणारी अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ६ अशा पारंपरिक कार्यालयीन वेळेत प्रयोगशाळेचे काम चालू शकत नाही.

मुंढे यांनी स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांकडून २४ तास काम करून घेतले जात नाही. शिफ्ट पद्धतीने काम सुरू असून आठवड्याला ४८ तासांपेक्षा अधिक काम कोणालाही दिले जात नाही. तसेच नियमानुसार साप्ताहिक सुट्टीही दिली जाते. आवश्यकतेनुसार प्रयोगशाळा २४ तास सुरू ठेवावी लागू शकते. काही गैरसमज झाले असतील तर ते दूर केले जातील, मात्र जनतेच्या आरोग्याशी संबंधित कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत