दिल्लीत सचिन अहिर यांची केंद्रीय मंत्र्यांशी बैठक; मुंबईच्या पुनर्विकास, रेल्वे आणि मिठागरांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

महाराष्ट्र

मुंबई: मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनी, रेल्वेच्या जागा, मिठागरांचा विकास आणि विविध पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या या दौऱ्यात विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती अहिर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपसभापती झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा होता. या दौऱ्यात लोकसभाध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, बंदर व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेण्यात आली.

गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुंबईतील राज्य व केंद्र सरकारच्या जमिनींवरील पुनर्विकासासाठी एकसमान धोरणाची गरज मांडण्यात आली. तसेच कुलाबा व बॅलार्ड पिअर परिसरातील झोपड्या आणि मोडकळीस आलेल्या सेस इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प एनओसीअभावी रखडल्याने त्यासाठी स्वतंत्र उच्चस्तरीय बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकातील सुविधा तसेच मुंबईतील महालक्ष्मी आणि प्रभादेवी स्थानकांच्या उन्नतीकरणाबाबत लवकरच महत्त्वाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याशी एनटीसीच्या ताब्यातील बंद गिरण्यांच्या जमिनी कामगारांच्या पुनर्वसनासाठी ‘म्हाडा’कडे हस्तांतरित करण्याबाबत आणि चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. हा विषय केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मिठागरांच्या जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित करून प्रकल्पग्रस्त, बेघर, गिरणी कामगार आणि वंचित घटकांसाठी परवडणारी घरे उभारावीत, अशी मागणीही सचिन अहिर यांनी केली.

दिल्ली दौऱ्यादरम्यान आयुष मंत्रालयाच्या कार्यक्रमात सहभाग घेत तळागाळातील नागरिकांना आयुष योजनांचा अधिक लाभ मिळावा यासाठी जनजागृती वाढविण्याची सूचना त्यांनी केली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या शिष्टमंडळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, संजय पाटील, ओमराजे निंबाळकर, श्रीरंग बारणे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत