पुणे : ‘संघटित शिल्पकार संघ, महाराष्ट्र राज्य’ आणि एम.आय.टी. ए.डी.टी. विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यान आणि ‘स्टुडिओ व्हिजिट’चे आयोजन करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या १५० हून अधिक विद्यार्थी आणि शिल्पकारांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात कांदिवली येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध शिल्पकार आणि संघटित शिल्पकार संघाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय चंद्रजीत यादव यांना भावपूर्ण मानवंदना अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा व्ही. पी. कर्मरकर यांच्या जीवनकार्यावरील पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
एम.आय.टी. ए.डी.टी. विद्यापीठाच्या क्रिएटिव्ह क्लस्टरचे प्रो-व्हाइस चान्सलर तथा एम.आय.टी. इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे डीन प्रो. डॉ. नचिकेत ठाकूर, प्रो. एम. पी. पवार, सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे, मंदिलकर आर्टचे प्राचार्य मंदिलकर, विवेक खटावकर, मुकेश पुरव, सचिन महापणकर, सुनील देशपांडे, नितीन मेस्त्री आणि अजित शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात कला क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, शिल्पकलेचे भविष्य, व्यावसायिक संधी तसेच शिल्पनिर्मितीतील विविध बारकावे या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित ‘स्टुडिओ व्हिजिट’मध्ये विद्यार्थ्यांना शिल्पनिर्मितीतील आधुनिक तंत्रे, विविध पद्धती आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा अनुभव घेता आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि युवा शिल्पकारांना शिल्पकलेतील बदलते तंत्रज्ञान, आधुनिक निर्मिती प्रक्रिया तसेच भविष्यातील व्यावसायिक संधी यांची दिशा मिळाली. बदलत्या काळानुसार शिल्पकलेत होत असलेल्या तांत्रिक बदलांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाल्याने हा उपक्रम मार्गदर्शक ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी विद्यार्थी, शिल्पकार, प्रोग्रेसिव्ह स्कल्पचर असोसिएशन, प्रोग्रेसिव्ह स्कल्पचर ग्रुपचे सदस्य तसेच एम.आय.टी. प्रशासनाचे आयोजकांतर्फे आभार मानण्यात आले.संघटित शिल्पकार संघाचे खजिनदार आणि मालाड येथील शिल्पकार अजिंक्य चौलकर यांनी या उपक्रमाची माहिती दिली.