मुंबई: Eknath Shinde यांनी ठाण्यातील अत्याधुनिक ‘लेग्रँड इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड एज्युकेशन’ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करताना, “हे केवळ इमारतीचे उद्घाटन नसून युवकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांना नवी दिशा देणाऱ्या प्रवासाची सुरुवात आहे,” असे प्रतिपादन केले.
ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha, फ्रान्सच्या मुंबईतील उप-वाणिज्यदूत ॲग्नेस सिल्वा, Legrand India चे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी बर्लँड, सीएसआर विभागाच्या उपाध्यक्षा आबिदा अनिझ, SkillSonics चे सीईओ प्रसन्नजीत कुंडू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सीएसआर उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या संस्थेमुळे स्थानिक युवकांना मोफत प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या केंद्रातून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“आज विविध उद्योगांना प्रशिक्षित आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज आहे. युवकांना आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्याचे काम हे केंद्र करणार आहे. त्यामुळे युवकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल,” असेही ते म्हणाले.
ठाण्याच्या बदलत्या औद्योगिक चित्राचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, एकेकाळी आशियातील अग्रगण्य औद्योगिक केंद्र असलेली वागळे इंडस्ट्रियल इस्टेट आता आयटी, डेटा सेंटर आणि सेवा उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. त्यामुळे प्रशिक्षित युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत.
रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात इलेक्ट्रिशियन व तांत्रिक मनुष्यबळाची मोठी मागणी असल्याचे नमूद करत त्यांनी येथे प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.
राज्यात वाढणाऱ्या परदेशी गुंतवणुकीचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि प्रशिक्षित मनुष्यबळामुळे महाराष्ट्र उद्योगांसाठी सर्वाधिक अनुकूल राज्य ठरत आहे. डेटा सेंटर, आयटी आणि उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोलीतील कौशल्य विकास उपक्रमांचा दाखला देत त्यांनी प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींमुळे अनेक युवकांचे आयुष्य बदलल्याचे नमूद केले. “कौशल्य विकास हीच देशाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे,” असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करत, “ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका,” असा संदेश दिला.
Legrand India आणि एनएसडीसी मान्यताप्राप्त SkillSonics यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे सुमारे ८ हजार चौरस फुटांचे प्रशिक्षण केंद्र आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच इलेक्ट्रिशियन आणि तंत्रज्ञांसाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण देणार आहे. दरवर्षी एक हजारांहून अधिक युवकांना येथे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होणार आहे.