खरगेंच्या सभास्थळाचे हवन करून शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल

महाराष्ट्र

मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे घेतलेल्या सभेनंतर त्या ठिकाणी हवन करून शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज राज्यभर आंदोलन केले. पुण्यात बालगंधर्व चौकात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला. “ही विकृत आणि सडलेली मानसिकता असून, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा कुटील डाव आहे. हा डाव काँग्रेस हाणून पाडेल,” असा आरोप सपकाळ यांनी केला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेच्या जागेचे शुद्धीकरण करण्याची कृती ही त्यांचा अपमान करणारी असल्याचे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. पुण्यातील आंदोलनाला माजी मंत्री यशोमती ठाकूर, आमदार डॉ. विश्वजित कदम, रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, पुणे शहर पूर्व काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिमच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, माजी अध्यक्ष अरविंद शिंदे, महानगरपालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या विचारांनी राज्याभिषेक नाकारला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विरोध केला आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारला, त्याच मनुवादी प्रवृत्तींना आजही भाजपकडून खतपाणी घातले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

“मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतलेल्या रॅलीची जागा अशुद्ध झाली, या मानसिकतेतून हवन करण्यात आले. ही कृती अत्यंत संतापजनक आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे अस्पृश्यतेसारख्या प्रवृत्ती दिसून येणे हे देशाचे दुर्दैव आहे,” असे सपकाळ यांनी म्हटले.

या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसने राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत सामाजिक समतेचा संदेश दिला. संबंधित प्रवृत्तींविरोधात काँग्रेसचा संघर्ष यापुढेही सुरू राहील, असा इशारा पक्षाच्या नेत्यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत