पुणे : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आता हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवले आहे. पुण्यात त्यांनी ‘द नाईन्स’ नावाने बार आणि रेस्टॉरंट सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी या हॉटेलचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामुळे चाकणकर यांच्या नव्या व्यवसायाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
रूपाली चाकणकर या गेल्या काही काळापासून राजकीय आणि सामाजिक कारणांमुळे चर्चेत आहेत. नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी त्यांचे नाव जोडले गेल्यानंतर त्यांच्यावर राजकीय विरोधकांकडून टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सोडली.
या पार्श्वभूमीवर आता चाकणकर यांनी व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला आहे. ‘द नाईन्स’ या नव्या बार आणि रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती राहिल्याने या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
बदनामीप्रकरणी १९ जणांविरोधात गुन्हा
दरम्यान, रूपाली चाकणकर यांची कथित बदनामी केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या तक्रारीवरून १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सोशल मीडिया पदाधिकारी योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, ‘द नाईन्स’च्या उद्घाटनानंतर चाकणकर यांच्या व्यवसायातील नव्या भूमिकेची आणि उद्घाटनाला उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांची चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.