शिरुर; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री महामार्गावर धुडगूस; शिरुरच्या DB पथकाने २४ तासांत मुसक्या आवळल्या

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत वाहकाच्या खिशातील तिकिटाच्या जमा रकमेतील ८ हजार ९६० रुपये जबरदस्तीने लुटणे, बसची समोरील काच दगडाने फोडणे आणि बसची चावी घेऊन पसार होणे, असा गंभीर प्रकार करणाऱ्या चौघांच्या शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध (DB) पथकाने अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या असुन आरोपींच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओही पोलिसांनी जप्त केली आहे.

हि घटना ४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १.४५ वाजता शिरुर हद्दीतील न्हावरे फाट्याच्या कानिफनाथ मंदिर परिसरात घडली होती. एस टी बस क्रमांक एमएच १४ एनपी ०८३८ घेऊन चालक संदिप गणपत थोरवे जात असताना नंबर नसलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने बसचा रस्ता अडविला. गाडी बसला घासल्याचा बहाणा करीत स्कॉर्पिओमधून चौघे खाली उतरले. त्यांनी चालक संदिप थोरवे आणि वाहक सतिष आण्णासाहेब बाचकर यांना शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपींनी वाहकाच्या वरच्या खिशातील तिकिटाच्या जमा रकमेतील ८,९६० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.

या लुटीनंतरही आरोपींनी धुडगूस घालत रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्यांनी एसटी बसच्या समोरील काचेवर मारत काच फोडली. त्यानंतर बसची चावी घेऊन चौघेही स्कॉर्पिओमधून पसार झाले. त्यामुळे रात्रीच्या वेळी महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला.

या घटनेनंतर शिरुर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला वेग दिला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि शिरुर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि गुन्हे शोध (DB) पथकाने आरोपींच्या शोधासाठी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

सदरच्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी केवळ शिरुर परिसरापुरता तपास मर्यादित न ठेवता शिरुर, अहिल्यानगर, आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्यात आली.

या तपासातून अजयकुमार शिनु चव्हाण, पवन मधुकर घोलप, आकाश सोमनाथ काळे आणि सचिन अशोक घोलप यांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरात कारवाई करीत चौघांनाही ताब्यात घेत अटक केली.

अटक आरोपींमध्ये अजयकुमार शिनु चव्हाण (वय २४), पवन मधुकर घोलप (वय २५), आकाश सोमनाथ काळे (वय २१) आणि सचिन अशोक घोलप (वय २२) यांचा समावेश आहे. चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार क्रमांक एम एच १४ एम डब्ल्यू ५२३४ पोलिसांनी जप्त केली आहे.

दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत असून, पोलीस कोठडी दरम्यान आरोपींकडून या गुन्ह्याबाबत आणखी कोणती माहिती समोर येते, तसेच त्यांचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा तपास होण्याची शक्यता आहे.

DB पथकाच्या कामगिरीला सलाम…

सदरची धडाकेबाज कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि शिरुरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, राहुल वाघमोडे, अंबादास थोरे, निखील रावडे, सचिन भोई, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत