दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत!

महाराष्ट्र

सुनेत्रा अजित पवार यांच्या पुढाकारातून आमदारांचा स्तुत्य निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेतनाचे धनादेश सुपूर्द

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान वेतनाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडले असून, त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सामाजिक बांधिलकी जपत हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे, हीच स्वर्गीय अजितदादांनी दिलेली खरी शिकवण असल्याची भावना आमदारांनी यावेळी व्यक्त केली.

स्व. अजित पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योगदान देणे आणि शेतकरी हितासाठी सदैव कटिबद्ध राहणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच प्रामाणिक भावनेतून एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या संकटात लोकप्रतिनिधींनीही आपले योगदान द्यावे, या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत