महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये मद्यपानास ‘शून्य सहनशीलता’

महाराष्ट्र

चालक-वाहकांची दररोज अल्कोटेस्ट सक्ती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सेवेत असताना मद्यपानास पूर्णविराम देण्यासाठी प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण जाहीर केले आहे. आगारात हजर होणाऱ्या सर्व चालक व वाहकांची दररोज अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी अनिवार्य करण्यात आली असून योग्य नोंदीनंतरच कर्तव्यावर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

२५ जानेवारी रोजी प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली असता चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या तसेच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती.

चौकशी अहवालानुसार दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. समितीने सुचविलेल्या उपाययोजना राज्यातील सर्व आगारांमध्ये तातडीने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काय असतील प्रमुख उपाययोजना?

आगारात हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांकडून नियमित अल्कोटेस्ट तपासणी

वाहकांचीही ड्युटीपूर्वी मद्यपान तपासणी व नोंद सक्तीची

सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक आदी अधिकाऱ्यांकडून देखरेख

बस मार्गावर लॉगबुक नोंदीनंतर पुन्हा अल्कोटेस्ट तपासणी

स्थानक प्रमुखांकडून अंमलबजावणीची खात्री

दक्षता विभागाकडून गोपनीय तपासणी मोहीम

याशिवाय चालक-वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्रे व ‘मद्यपान जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. बसस्थानक व आगार परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व इतर सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी प्रशासनाने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे बससेवा अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.