वडनेर येथून तब्बल दहा शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारी, केबल चोरीला

क्राईम

शिरुर (अरुणकुमार मोटे): वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथून एकाच वेळी दहा शेतकऱ्यांच्या मोटारी,केबल आणि पॅनल बॉक्स चोरी गेले आहेत. चोरीचे एकामागून एक प्रकार घडत असल्याने या परिसरातील नागरिक असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. या भागात चोऱ्या वारंवांर घडत आहे. याच आठवड्यात चोरट्यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच लावलेल्या शववाहिनी (स्वर्ग रथ) वाहनाच्या बॅटरी वर डल्ला मारला आहे. कवठे येमाई हद्दीतील घोडनदी वरील प्रताप जाधव यांचा पाच एच पी चा कृषी पंप चोरुन नेला आहे.

यापूर्वी या वर्षभरात विद्युत पंप,केबल,ठिबक संच, कृषिची दुकाने, घरफोडी अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. घरफोडी मध्ये शासकीय सेवेतील दोन निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरफोडीचाही समावेश आहे. त्यामुळे चार महिने उलटूनही या साऱ्या घटनांचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांना वेळोवेळी बंदोबस्तासाठी बाहेर जावे लागते. यामुळे वारंवार होणाऱ्या चोऱ्यांचा तपास करणेस पाहिजे तितका वेळ पोलिसांना मिळत नाही, असेही कारण पोलिसांकडून पुढे येत आहे. कधी कधी तक्रार देण्यासाठी तक्रारदारांना टाकळी हाजी दुरक्षेत्र येथे कर्मचारी नसल्याने शिरूरला जावे लागते. अनेक चोरीच्या घटना घडूनही तपास न लागल्याने चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.