निवडणुकीच्या चर्चेतून रक्तरंजित कृत्य? सात वर्षांच्या लेकीची कॅनलमध्ये फेकून हत्या

क्राईम महाराष्ट्र

नांदेड: एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी पांडुरंग कोंडामंगले (वय ३२) याने आपल्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनलमध्ये फेकून दिल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

पांडुरंग कोंडामंगले याचे बाऱ्हाळी येथे कटिंग दुकान असून त्याला तीन आपत्य आहेत. तीन दिवसांपूर्वी साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून तो सात वर्षांची मुलगी प्राची कोंडामंगले हिला सोबत घेऊन घराबाहेर पडला होता. मात्र, तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनलमध्ये त्याने मुलीला फेकून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो एकटाच घरी परतला.

दरम्यान, कॅनलमध्ये एका चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने तेलंगणा राज्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला. तपासादरम्यान संशय बळावल्याने ३० जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले याला ताब्यात घेतले व अटक केली.

या घटनेनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. आर्थिक विवंचना, कौटुंबिक तणाव किंवा अन्य कारणांमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे. तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उमेदवारी करण्याची तयारी पांडुरंग कोंडामंगले करत असल्याचीही चर्चा होती. तीन आपत्य असल्याने निवडणुकीत अडथळा ठरू नये, या संशयातूनच हे कृत्य करण्यात आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.मात्र, हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या अमानुष घटनेमुळे केरूर गावासह संपूर्ण मुखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.