शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत (थोरातवस्ती) येथे (दि. २९) एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने दागिने लांबवले. यामध्ये महिलेच्या कानाच्या पाळीस देखील गंभीर दुखापत झाली असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिराबाई लक्ष्मण थोरात (वय ५२), व्यवसाय शेती, रा. जांबुत, थोरातवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या २९ एप्रिल रोजी पहाटे २ ते २.३० दरम्यान झोपले असताना, दोन अज्ञात २५ ते ३० वयोगटातील इसमांनी त्यांच्या घराची खिडकी उचकटून आत प्रवेश केला. त्यापैकी एका व्यक्तीणे त्यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले जबरदस्तीने हिसकावून घेतले, तर दुसऱ्या व्यक्तीने दोन्ही कानातील सोन्याच्या कुड्या काढून घेतल्या. डाव्या कानातील कुडी निघत नसल्याने ती जोरात ओढण्यात आल्यामुळे त्यांच्या कानाच्या पाळीस गंभीर जखम झाली आहे.
सदर प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे. या प्रकारामुळे बेट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलीस विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि लवकरच आरोपींचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.