रांजणगाव गणपती (तेजस फडके): औद्योगिक वसाहतीत कंपन्यांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या केबल चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना मोठे यश आले आहे. स्पर्श इलेक्ट्रॉनिक कंपनीतील केबल वायर बंडल चोरी प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल १८,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दोन गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रात्रीच्या अंधारात डाव साधत चोरी
दि २ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रांजणगाव, खंडाळे माथा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील स्पर्श इलेक्ट्रॉनिक कंपनीतुन अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात केबल वायर बंडल लंपास केले होते. या प्रकरणी अर्केज रामराव शिंदे (रा. शिक्रापुर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
५० हून अधिक सीसीटीव्हींची छाननी; तांत्रिक विश्लेषणाचा वापर
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शिक्रापूर, रांजणगाव आणि परिसरातील ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे तळेगाव ढमढेरे परिसरातील संशयितांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
पोलीस अंमलदार उमेश कुतवळ यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तळेगाव ढमढेरे येथील तिघे जण रात्रीच्या वेळी कंपन्यांतील केबल चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले.
अटक आरोपीकडुन कबुली जबाबात मोठा खुलासा…
त्यानंतर तपास पथकाने विकास संतोष पवार (वय २७, रा. मुखई-इंदिरानगर, ता. शिरुर, जि. पुणे), रोहित गणेश शिंदे (वय २०, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे), ओमकार फकिरा काळे (वय २०, रा. तळेगाव ढमढेरे) या आरोपींना ताब्यात घेत सखोल चौकशी केली.
या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचा माल त्यांनी कोंढवा खुर्द, पुणे येथील फैजान इमरान खान (वय २३) याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार चौथ्या आरोपीस अटक करण्यात आली.
तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल जप्त….
या सर्व आरोपींकडून चोरीचा माल, गुन्ह्यात वापरलेली मालवाहू कॅरी आणि दोन मोटारसायकली असा एकूण १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली असून, या आरोपींनी ऑगस्ट २०२५ मध्येही याच कंपनीत चोरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या टोळीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…
हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षण महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर तसेच होमगार्ड राहुल इचके, शैलेश जगताप, बारकू गोडसे आणि रामदास शिंदे यांनी सहभाग घेतला.
या घटनेचा पुढील अधिक तपास दत्तात्रय शिंदे करत आहेत. औद्योगिक वसाहतीत वाढत्या केबल चोरीच्या घटनांमुळे उद्योजकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून औद्योगिक क्षेत्रात दिलासा व्यक्त केला जात आहे.