शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय गायकवाड यांची मा. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जवळपास सहा वर्षे चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर मा. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि कायदेशीर बाबींचा सखोल विचार करून हा निकाल दिला.
या प्रकरणात दत्तात्रय गायकवाड यांच्यावर पत्नी सारिका गायकवाड हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून केल्याचा आरोप होता. घटनेनंतर आरोपी स्वतः शिरूर पोलीस ठाण्यात हजर झाल्याने त्या वेळी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एन. काबुगडे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाकडून एकूण ११ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. मात्र, आरोपीविरुद्ध गुन्हा निर्विवादपणे सिद्ध करणारी परिस्थितीजन्य पुराव्यांची अखंड साखळी उभी करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना नमूद केले की, आरोपीविरुद्धचा गुन्हा ‘वाजवी शंकेपलीकडे’ सिद्ध होणे आवश्यक असते. परंतु, सादर केलेले पुरावे त्या निकषांवर खरे उतरत नसल्याने आरोपीस संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता देण्यात आली.
आरोपीच्या बचावासाठी अॅड. जयसिंग पडवळ, अॅड. उदय सरोदे आणि अॅड. अभिषेक बाफणा यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाने तपासातील त्रुटी, पुराव्यांतील विसंगती आणि परिस्थितीजन्य पुराव्यांतील अपूर्णता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
निकालानंतर अॅड. उदय सरोदे यांनी सांगितले की, “न्यायालयाने सर्व बाबींचा सखोल विचार करून निर्णय दिला आहे. प्रत्येक निरपराध व्यक्तीस न्याय मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे.”या निकालामुळे शिरूर परिसरात चर्चित ठरलेल्या या प्रकरणाची पुन्हा चर्चा रंगली असून, न्यायालयीन प्रक्रियेत भक्कम व सुसंगत पुराव्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.