2.80 कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचं केलं सिनेस्टाईल अपहरण…

क्राईम

औरंगाबाद: औरंगाबाद मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असून आहे. 2.80 कोटींच्या खंडणीसाठी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे वेळीच या अधिकाऱ्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील इब्राहिमपूर तालुक्यात ही घटना घडली. शनिवार (दि.17) रोजी दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास उद्योग मंत्रालयातील सेवा निवृत्त अधिकारी विश्वनाथ लक्ष्मण राजळे (60) यांचं अपहरण करण्यात आलं होतं.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरीला असलेले राजळे चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले. दरम्यान शनिवार (दि.17) रोजी ते आपल्या बीड रोडवरील छत्रपती संभाजीराजे कारखान्याजवळील इब्राहिमपूर शिवारातील शेतात आले होते. शेतात बांधलेल्या फार्म हाऊसवर ते थांबले असतानाच तिथे अनोळखी पाच ते सहाजण आले. तसेच राजळे यांना चाकूचा धाक दाखवीत बळजबरीने कारमध्ये बसविले.

पाच ते सहा जणांनी राजळे यांना चाकूचा धाक दाखवत बळजबरीने कारमध्ये बसवत असल्याचे त्यांच्या सालगड्याने पाहिले. मालकाला अज्ञात लोकं घेऊन जात असल्याचं पाहून त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे राजळे यांचे अपहरण करण्यासाठी आलेल्या चार पाच जणांनी त्याला मारहाण केली. तसेच त्याला एका खोलीत डांबून ठेवलं.

सालगड्याला कोंडून ठेवल्यावर अपहरणकर्ते फरार झाले. त्यानंतर काही वेळाने सालगड्याची पत्नी तिथे आली. त्यावेळी सालगड्याने तिला आवाज दिल्यावर तिने दरवाजा उघडला. सालगड्याने लगचेच याची माहिती राजळे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिस पथकाने दावलवाडी (ता. बदनापूर ) शिवारातील एक पेट्रोल पंपावर रात्री 9 वाजेच्या सुमारास सापळा लावत राजळे यांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. ज्यात विकास भगवान खरात (वय 22), पांडुरंग विष्णू पडूळ (वय 22), रोहित दीपक भागवत (वय 18), बबनराव वाघ (वय 44), राहुल बबन गुंजकर (वय 29), दीपक भागवत (वय 44) अशी आरोपींचे नावे आहेत.