गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित! धनदांडग्यांना लाभ नाही; चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र

धाराशिव: राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार असून, शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द निश्चितपणे पाळला जाईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. वर्षानुवर्षे शेतात राबूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या गरीब शेतकऱ्यांसाठीच ही कर्जमाफी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे आयोजित सभेत बोलताना बावनकुळे म्हणाले की, फार्महाऊसधारक, मोठ्या जमिनीचे मालक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. प्रत्यक्ष शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या खऱ्या गरजू गरीब शेतकऱ्यांनाच या योजनेत समाविष्ट केले जाईल.

कर्जावर व्याज आणि व्याजावर व्याज वाढत गेल्याने अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली सापडतात. काही वेळा त्यातून टोकाचे निर्णय घेतले जातात. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. अनेक शेतकरी ३०–४० वर्षे शेतात कष्ट करूनही कर्जमुक्त होत नाहीत; अशा शेतकऱ्यांना आत्महत्येपर्यंत जाण्याची वेळ येऊ दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, कर्जमाफीपुरतेच न थांबता भविष्यात शेतकऱ्यांना वारंवार कर्ज घ्यावे लागू नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर सरकार विचार करत आहे. शेती उत्पन्न वाढवणे, खर्च कमी करणे आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.

दरम्यान, कर्जमाफी फक्त ‘गरीब शेतकऱ्यांनाच’ दिली जाणार असल्याने, गरिबी ठरवण्याचे निकष काय असतील, कोणते शेतकरी पात्र ठरणार आणि कोण वगळले जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने शेतकरी वर्गाकडून मार्गदर्शक तत्त्वांची मागणी केली जात आहे.

यावेळी बावनकुळे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबतही भूमिका स्पष्ट करत सांगितले की, काँग्रेसशासित राज्यांमध्ये ही योजना बंद करण्यात आली असली तरी भाजपशासित राज्यांमध्ये ती सुरू आहे आणि महाराष्ट्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरूच राहील. तसेच केंद्र सरकारच्या ‘एक कोटी लखपती दीदी’ योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना विनातारण, विनाहमी पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.